प्रशांत कुळकर्णी

लहानपणी “कधी एकदा मोठे होतो” ही असणारी ओढ मोठे झाल्यावर “पुन्हा एकदा लहान होता आले तर बरे होईल” ह्यात कधी बदलते कळत नाही. परंतु गणपती यायचे वेध लागले की पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते आणि पुन्हा एकदा ‘श्रीराम गणेश मंडळाचे’ ते दिवस जगावेसे वाटतात. ‘श्रीराम गणेश मंडळ’ - आमचे गणपती मंडळ. आमचे म्हणजे मी, माझा भाऊ प्रसाद, माझा जिवलग मित्र संदीप निफाडकर, अमरजीत आरंभी, अमित आरंभी, विशाल उपासनी, प्रितीश उपासनी तसेच केयूर निफाडकर आणि भरत पटेल यांचे. वास्तविक हे मंडळ सुरू केले ते मिलिंद कुळकर्णीने. तेव्हा आम्ही त्याचे ‘छोटे शिलेदार’ होतो नंतर तो शिक्षणासाठी बाहेर गेला आणि सर्व जबाबदारी आम्हा ‘छोट्या शिलेदारांवर’ आली. गणपती येण्याच्या साधारणतः महिना दीड महिना आधी आमची पहिली बैठक एक तर माझ्याघरी नाहीतर संदीप कडे व्हायची. आणि यावर्षी जास्तीत जास्त वर्गणी गोळा करून बाप्पाची मोठी मूर्ती आणायची हा पहिला ठराव पास व्हायचा. अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे सगळे नंतर ठरायचे. मला मात्र कायमस्वरूपी कोषाध्यक्षाचीच जबाबदारी होती. पावती पुस्तक किती पावत्यांचे आणायचे इथून चर्चेला सुरुवात होऊन मग मूर्ती कुठून घ्यायची, सजावट काय करायची, दररोजचा प्रसाद काय ते थेट शेवटच्या दिवशी विसर्जनाला गुलाल किती आणायचा इथपर्यंत पोहोचायची.

          कुठलेही मंडळ म्हटले की थोडेफार रुसवे फुगवे असणारच. गणपतीच्या आरतीचा पहिला मान मुख्यत्वे करून अध्यक्षाला दिला जायचा पण खरी मजा त्यापुढे यायची कारण अध्यक्षानंतर आरतीचा मान कोणाचा यावर बराच खल व्हायचा पण नंतर निर्णय सामंजस्यानेच व्हायचा.  सुरुवातीला पाच रुपये वर्गणी मिळाली तरी खूप आनंद व्हायचा पण पैसे मात्र कमी गोळा व्हायचे मग सजावट करताना खूप विचार करून खर्च करावा लागायचा. नंतर हळूहळू वर्गणी वाढली त्यामुळे सजावटीवरचा खर्चही वाढला पण काही गोष्टी जशा की पडदे म्हणून प्रत्येकाच्या घरून चादर आणणे, आदल्या वर्षीचे खराब न झालेले सजावटीचे सामान पुन्हा वापरणे ह्या गोष्टी मात्र दरवर्षी व्हायच्या. गणपतीचे पाचही दिवस प्रसाद प्रत्येकाच्या घरातूनच यायचा मात्र शेवटच्या दिवशी मंडळातर्फे प्रसाद आणून ‘खिरापतीची पाकीटं’ करून वर्गणी देणाऱ्या प्रत्येकापर्यंत प्रसाद पोहोचवण्याचे काम जवळजवळ प्रत्येक वर्षी केले जायचे. सुरुवातीला छोटी मूर्ती बसवताना कधीतरी आपणही मोठी मूर्ती आणायची हे आमचे स्वप्न संदीप अध्यक्ष असताना बाप्पाने पूर्ण केले. तसेच प्रसाद - माझा भाऊ अध्यक्ष असताना आरास स्पर्धेत पारितोषिक मिळवण्याचे आमचे स्वप्नही बाप्पाने पूर्ण केले आणि तेही मोठ्या मंडळांशी स्पर्धा करून.

          शाळा शिकवण्या वगैरे करून ही सर्व कामे पार पाडतांना कधीही थकवा जाणवायचा नाही. आपापसात झालेल्या लुटूपुटूच्या लढायाही अल्पकाळच टिकायच्या. हळूहळू विसर्जनाचा दिवस समोर येऊन उभा ठाकायचा. मग मागच्या वर्षीपेक्षा जास्त गुलाल आणणे, मंडळातर्फे सदस्यांना “गणपती बाप्पा मोरया” लिहिलेल्या डोक्याला लावायच्या पट्ट्या वाटण्यासाठी आणणे यासाठी तहहयात कोषाध्यक्ष असलेल्या मला आधीपासूनच केलेली गोळाबेरीज कामास यायची. सदस्यही खुष व्हायचे आणि विसर्जनाच्या तयारीला जोर यायचा. आमचे लहान मुलांचे मंडळ असल्याने तसेच वर्गणीही कमी गोळा होत असल्याने ढोल ताशा ही वाद्य असण्याचा प्रश्नच नव्हता. पण आमच्या गल्लीतलेच मोठे मंडळ म्हणजे श्री स्वामी विवेकानंद गणेश मंडळाचे सहकारी मिरवणुकीसाठी आम्हाला ढोल ताशे देऊन आमचा आनंद द्विगुणीत करायची. खर्चात काटकसर करून हातगाडीला लावण्यासाठी बनवलेला ‘कापडी फलक’, मंडळाचा हक्काचा आणलेला फोकस लाईट आणि वडीलधाऱ्या लोकांकडून न घेता मंडळाच्या वर्गणीतून आणलेला पहिला एक पोती गुलाल, एरवी साधे पण मिरवणुकीच्या दिवशी बाप्पासाठी आणलेला मोठा गुलाबाचा हार ह्या गोष्टी त्या वयात सर्वांनाच खूप आनंद द्यायच्या. आरास स्पर्धेत बक्षीस मिळाल्यानंतर वर्तमानपत्रात झळकलेले मंडळाचे नाव व मंडळाची छापून आलेली माहिती या गोष्टी आनंद द्विगुणित करणाऱ्या व त्या वयात आपण खूप काही साध्य केलंय हे वाटणाऱ्याच.        विसर्जनाच्या दिवशी सकाळची आरती झाल्यानंतर दुपारच्या मिरवणुकीची तयारी सुरू व्हायची. आणि ही तयारी करता करता दुपारची मिरवणुकीची वेळ कधी येऊन ठेपायची हे कळायचेही नाही. आमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या केयूर आणि भरत ह्यांच्याकडे या दिवशी एक महत्त्वाची जबाबदारी असायची आणि ती म्हणजे आम्हा सर्वांकडे लक्ष देऊन विसर्जन व्यवस्थित पार पाडणे. लहानग्या अमित कडेही एक मोठी जबाबदारी असायची बाप्पाची मूर्ती नीट पकडून हातगाडीवर बसणे. ढोल ताशा वाजवत गुलालाची उधळण करत मिरवणूक सुरू व्हायची. मला ढोल वाजवू दे, मला ताशा वाजवू दे यावरून मित्रमंडळींमध्ये थोडीफार रुसवाफुगवी व्हायची पण शेवटी “गणपती बाप्पा मोरया” “मंगलमूर्ती मोरया” “पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात मिरवणूक विसर्जन स्थळी येऊन पोहोचायची. विसर्जनाआधीच्या आरतीच्या वेळी सर्वच जण हळवे व्हायचे मात्र ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद बाप्पाला घालून विसर्जन केले जायचे. आणि पुन्हा एकदा बाप्पाच्या जयघोषात आम्ही सर्वजण घराकडे निघायचो. पुढील कित्येक दिवस याच आठवणीत आम्ही सर्वजण रमायचो आणि पुढच्या वर्षी अजून काय चांगले करता येईल या चर्चेत गुंतायचो.पुढे शिक्षणासाठी, नोकरीसाठी बऱ्याच जणांना गाव सोडावे लागले पण आजही या सुवर्ण आठवणी मनात घर करून आहेत. बाल वयातील हे दिवस पुन्हा येणार नाहीत हे माहीत असूनही प्रत्येकाच्याच मनात ही एक सुप्त इच्छा आहे की हे बाप्पा तुझ्या कृपेने एकदा का होईना ते दिवस पुन्हा एकदा अनुभवू दे. 

गणपती बाप्पा मोरया !! मंगलमूर्ती मोरया !!